Top
संस्कृतभारती - कोङ्कणम्
Latest Media & News
नवी मुंबई जिल्हा संस्कृत संमेलन . वार: रविवार दिनांक:- ०४-०२-२०२४ दिनांक:- पौषमास: नवमी कृष्ण पक्ष युगाब्द ५१२५

योग विद्या निकेतन वाशी येथे दिनांक ०४-०२-२०२४ रोजी संस्कृताविष्कार: हे नवी मुम्बई जिल्हा संस्कृत संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. नवी मुंबई जिल्ह्याच्या पहिल्या संमेलनाला १० नगरातून १२० जणांनी हजेरी लावली होती. संमेलनाचे प्रमुख पाहुणे के जे सोमैया इंस्टीट्युट ऑफ टेकनॉलॉजी सायन या संस्थेचे प्राचार्य मा. डॉ. विवेक सुन्नपवार संमेलनाध्यक्ष योग विद्यानिकेतन-उपाध्यक्ष मा. दुर्गादास सावंत आणि प्रमुख वक्त्री - संस्कृत भारतीच्या कोकणप्रांताच्या सहमंत्री श्रीमती श्यामला भट यांच्या उपस्थितीत दुपारी ३.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन झाले. मान्यवरांनी भारत मातेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. पाहुणे व संमेलनाध्यक्षांचे स्वागतगीताने व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले नवी-मुंबई जनपद संयोजक श्री.अतुल भराटे यांनी जनपदात सुरू असलेले उपक्रम आणि संमेलनाच्या उद्देशाविषयी सविस्तर परिचय करून दिला. त्यानंतर अतिथी आणि संमेलनाचे अध्यक्ष यांनी सर्व उपस्थितांना भारतीय संस्कृतमधील संस्कृतचे महत्त्व सांगितले.
दुसरे सत्र होते - सांस्कृतिक कार्यक्रम. बाल केंद्रातील विद्यार्थ्यांनी आणि काही युवकांनी संस्कृत लघुनाटक व नृत्य सादर केले. तिसऱ्या सत्रात संस्कृत भारतीच्या कार्याचा परिचय सौ. ख्याती देशपांडे यांनी करून दिला. त्यांनी संस्कृतभारती संस्थेची संरचना आणि शैक्षणिक उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली. चौथ्या सत्रात शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्ती निमित्त श्री.चैतन्य पडळकर यांनी शिवरायांच्या राष्ट्रकार्यातील योगदानाबद्दल सांगितले. राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी संस्कृतचे महत्त्व जाणून प्रतिकुल परिस्थितीत संस्कृत राजमुद्रा आणि संस्कृत राजकोषाच्या निर्मितीसह महाराजांनी संस्कृत क्षेत्रात केलेले कार्य सांगितले.
पाचवे सत्र योगशास्त्र आणि संस्कृत याबद्दल होते. या सत्राला श्री.राजेंद्र जोशी यांनी योगशास्त्र आणि संस्कृतचे महत्त्व सांगितले. नंतर कु. सोनाली राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संघाने योगासनाचे प्रात्यक्षिक दाखविले. सहाव्या सत्रात ऍड. सौ चित्रा पाटकर यांनी भारतीय संस्कृतीत ज्योतिषशास्त्राचे महत्त्व आणि ज्योतिषशास्त्रात संस्कृतची आवश्यकता याविषयी सर्वांना मार्गदर्शन केले. संस्कृतभारती-कोकणप्रांत-विद्यालयप्रमुख श्री. नारायण वासुदेवन् यांनी सर्व उद्बोधनसत्रांचे अध्यक्षपद भूषविले. शेवटचे सत्र हे समारोपाचे सत्र होते. संमेलनाचे पाथेयभाषण ( समारोपभाषण) श्रीमती श्यामला भट यांनी केले. सरळ संस्कृतचा प्रचार करण्यासाठी संस्कृत भारतीच्या कार्याबद्दल त्यांनी सर्वांना उद्बोधित केले. झिरी या संस्कृत गावाचे उदाहरण देऊन संस्कृतमुळे आपल्या जीवनात कसा बदल होऊ शकतो ते सांगितले. नवी-मुंबई जिल्हा सह संयोजक - कैलास भालेराव यांनी आभारप्रदर्शन केले. शांतीमंत्राने संमेलनाची सांगता झाली. नंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद लुटला.
सेल्फी विभाग हा तरुण आणि वृद्धांसाठी आकर्षण ठरला. तिथे सर्वांनी उत्साहाने स्वतःची छायाचित्रे स्वीकारली. त्याचप्रमाणे वस्तू प्रदर्शन शिवकालीन साहित्य प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन व पुस्तक प्रदर्शन सर्वांनी उत्साहाने पाहिले. संस्कृतमधील ज्ञान भांडाराची ओळख करून देणा-ऱ्या १००+ वस्तू आणि १००+ फलक प्रदर्शनात होते. १५ कार्यकर्त्यांनी संमेलनाच्या कार्यासाठी पूर्ण दिवस खूप परिश्रम घेतले.
जयतु संस्कृतं जयतु भारतम्|.


  • Post By : Samskrita Barati Konkan
  • |
  • 22-02-2024
  • |