Top
संस्कृतभारती - कोङ्कणम्
Latest Media & News
संस्कृतभारती दक्षिण रत्नागिरी जिल्हा संमेलन संपन्न

संस्कृतभारतीचे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे संस्कृत संमेलन रत्नागिरी नगरातील रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात रविवार दि. ०४/०२/२०२४ रोजी संपन्न झाले. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत विविध सत्रांचे आयोजन या संमेलनात करण्यात आले होते. त्याबरोबरच पुस्तक प्रदर्शिनी वस्तू प्रदर्शिनी तसेच विज्ञान प्रदर्शिनी मांडण्यात आली होती.
संमेलनाच्या उद्घाटन सत्रात प्रमुख अतिथी म्हणून श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य मा. श्री. मंदार भिडे उपस्थित होते तर मुख्य वक्ते म्हणून संस्कृतभारती गोवाविभागमंत्री व संस्कृत शिक्षक मा. श्री. आत्माराम (प्रसाद) उमर्ये उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा अध्यापक संघाच्या अध्यक्षा सौ. रेखा इनामदार यांनी या संपूर्ण संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजिका सौ. अक्षया भागवत यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर झालेल्या पहिल्या सत्रात श्री. आत्माराम (प्रसाद) उमर्ये यांनी संस्कृतभारतीचा परिचय करून दिला व संस्कृत शिकण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
दुसऱ्या सत्रात संस्कृतभारती कोकणप्रांत प्रशिक्षणप्रमुख श्री. आशिष आठवले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष साजरे होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृतनिष्ठा या विषयावर भाषण केले.
तिसऱ्या सत्रामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्यानंतर श्रीमती संजीवनी विलणकर यांनी भारतमातेच्या मंदिराची संकल्पना सांगितली. भारतमातेच्या पूजनाचे अनुभवही त्यांनी सांगितले. तदनंतर प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात आले होते.
संमेलनाच्या समारोपसत्रात कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राचे संचालक व सहयोगी प्राध्यापक मा. डॉ. दिनकर मराठे यांनी पाथेयभाषण केले. यावेळी त्यांनी संस्कृत शिकण्याचा संस्कृत बोलण्याचा आणि संस्कृतचा प्रचार करण्याचा संकल्प करावा असे उपस्थितांस सूचवले. त्याचप्रमाणे संस्कृतच्या प्रसारासाठी कार्यकर्त्यांच्या नियमित मेलनाचे महत्त्व विशद केले. शान्तिमंत्राने संमेलनाचा समारोप झाला. शेवटी भारतमातेचे पूजन करून संमेलनाची सांगता झाली. या संमेलनाला दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ७० संस्कृतप्रेमी उपस्थित होते. संमेलनाला कोकण प्रांत अध्यक्षा डॉ. कल्पना आठल्ये यांचे मार्गदर्शन लाभले..


  • Post By : Samskrita Barati Konkan
  • |
  • 21-02-2024
  • |