Top
संस्कृतभारती - कोङ्कणम्
Latest Media & News
संस्कृत भारती कोंकण प्रान्तसंमेलन संपन्न

संस्कृत भारती कोंकण प्रान्तसंमेलन संपन्न

संस्कृतभारती ही सेवाभावी संघटना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्कृत प्रचार प्रसाराचे कार्य करते. या संस्थेच्या कोंकण प्रांतातील गोव्यापासून ते पालघर पर्यंतच्या कार्यकर्त्यांचे दोन दिवसांचे प्रांतसंमेलन नुकतेच क्षेत्र परशुराम येथे एस्. पी. एम्. विद्यालयात आयोजित करण्यात आले. संमेलनाची सुरुवात भगवान् परशुराम यांच्या मंदिरात देवासमोर नारळ ठेवून आणि दिवंगत पं. वसंत गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. प्रथमतः संमेलनातील संस्कृत प्रदर्शिनीचे उद्घाटन चिपळूण येथील प्रसिद्ध प्रवचनकार मा. श्री. धनंजय चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनात संस्कृत गाव संस्कृत घर व अरण्य हे सर्व चित्रे व मॉडेल्सच्या माध्यमातून प्रदर्शनात मांडले होते. गृहोपयोगी विविध वस्तू धान्ये भाज्या फळे विविध व्यवसाय शालोपयोगी साहित्य पूजासाहित्य विविध प्रसाधने यांसाठी संस्कृत शब्द प्राण्यांसाठी एकाच अर्थाचे विविध शब्द दाखविण्यात आले होते. कौटिलीय अर्थशास्त्र व संस्कृतमधील विज्ञान यांच्या पोस्टर्सचे प्रदर्शन होते. तसेच प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा हा आजच्या नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचा मुद्दा प्रदर्शनातून साकारला होता. पुस्तकप्रदर्शनात संस्कृतभारती आणि गायत्री प्रकाशनाची संस्कृत पुस्तके प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध होती.
परशुरामाच्या भूमीमध्ये संस्कृतविकासाच्या विचारमंथनासाठी संमेलन आयोजित केल्याबद्दल श्री. धनंजय चितळे यांनी संस्कृतभारतीला शुभेच्छा दिल्या. उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व उद्घाटक चिपळूण येथील डी. बी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट उपस्थित होते. संस्कृतमधली शब्द आणि अर्थ यांची शक्ती दाखविणारी एक कथा सांगून संस्कृतसाठी कार्य करणारे सर्व कार्यकर्ते भाग्यवान आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रमासाठी परशुराम संस्थान विश्वस्त समितीचे सदस्य मा. श्री. प्रशांत पटवर्धन उपस्थित होते. परशुराम संशोधन केंद्र सुरू करून संस्कृत व संस्कृतीच्या अध्ययनाला प्रोत्साहन देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात एस्. पी. एम्. संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून चिपळूण येथील आय्.एम्.एस्.सी.सी.आर्. महाविद्यालयाच्या समन्वयिका मा. सौ. अर्चना बक्षी उपस्थित होत्या. कार्यकर्त्यांसाठी असे संमेलन ऊर्जा आणि प्रेरणा देणारे असते असे मत त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. या उद्घाटन सोहळ्यासाठी आर्.सी.काळे विद्यालयाच्या निवृत्त मुख्याध्यापिका ज्येष्ठ संस्कृत शिक्षिका स्वागतसमितीच्या सदस्या मा. सौ. शीला केतकर चिपळूणातील प्रसिद्ध डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ता स्वागतसमितीचे सदस्य मा. डॉ. अमेय बेडेकर एस्.एम्.सी. उद्योगसमूहाचे प्रतिनिधी मा. श्री. अजय मेहता तसेच संस्कृतभारतीचे पश्चिम क्षेत्राध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर वझे अखिलभारत कुटुंबशिक्षाप्रमुख मा. श्री. टी. एन्. प्रभाकर कोंकण प्रांत अध्यक्षा मा. डॉ. कल्पना आठल्ये कोंकण प्रांतमंत्री मा. श्री. नीरज दांडेकर मंत्रिणी मा. सौ. श्यामला भट पश्चिमक्षेत्र संघटनमंत्री मा. श्री. विठ्ठल भट इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमानंतरच्या सत्रामध्ये संस्कृतभारतीच्या संघटनात्मक कार्य संस्कृत प्रचार बाल केंद्र देववाणी परीक्षा पत्रद्वारे संस्कृत योजना मान्यवरांशी व प्रचारमाध्यमांतून संपर्क गीताशिक्षण केंद्र या विविध योजना कार्ये व उपक्रमांची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली. त्या पुढील सत्रांमध्ये क्रमशः संस्कृतभारतीचे अखिलभारत श्लोकोच्चारणकेंद्रप्रमुख मा. श्री. चिन्मय आमशेकर यांनी संस्कृतच्या प्रचार प्रसाराच्या कार्यविस्तारासाठी कार्यकर्त्यांचे उद्बोधन केले. कोंकण प्रांत विद्वत्परिषत्प्रमुख मा. श्री. महाबल भट्ट यांनी प्राचीन ऋषी मुनी विद्वान पंडितांच्या साहित्यिकांच्या कथा सांगून कार्यकर्त्यांना प्रेरणा व उत्साह दिला. अखिलभारत कुटुंबशिक्षाप्रमुख मा. श्री. टी. एन्. प्रभाकर यांनी कुटुंब आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी कार्यकर्त्यांना विचारप्रवण केले.
सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये चिपळूण येथील मा. श्री. पराग लघाटे आणि मा. सौ. वीणा कुंटे यांनी आपल्या शिष्यांसह संस्कृतगीतांची सुरेल मैफिल रंगविली. यामध्ये संस्कृत गीतांसह मराठीतून संस्कृतमध्ये अनुवादित केलेल्या गीतांचाही समावेश होता. या संगीतकार्यक्रमाचे निवेदन कु. केतकी मुसळे हिने केले. कार्यक्रमाची सुरुवात ओम् नमोजी आद्या या ज्ञानेश्वरमहाराजांच्या रचनेच्या सामूहिक गायनाने झाली. कु. गंधाली भागवत कु. मधुरा सोमण श्री. सारंग आठवले कु. अनुश्री भागवत यांनी संस्कृतगीते स्पष्ट उच्चारणात सादर केली. परशुराम क्षेत्रात संपन्न होत असलेल्या संमेलनाचे औचित्य साधून या संगीतमैफिलीची सांगता श्रीपरशुरामांच्या संस्कृत आरतीच्या सामूहिक सादरीकरणाने झाली. या सुमधुर गीतगायनाला संवादिनीवर श्री. पराग लघाटे व कु. ओजस कुंटे यांनी आणि तबल्यावर कु. सूरज पाटणकर आणि तालवाद्यावर कु. मेघ देवळेकर यांनी सुरेख साथ केली. या संस्कृतगीतगायन कार्यक्रमाने संस्कृत संमेलनाचे वातावरण संगीतमय झाले.
दुसऱ्या दिवशी संस्कृतभारतीच्या दरवर्षी केल्या जाणाऱ्या पत्रद्वारासंस्कृत सम्भाषणशिबिर सम्पर्क समर्पण समाजनिधिसंकलन या पाच अभियानांची माहिती देऊन कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोंकण प्रांताचे संघचालक मा. श्री. बाबा चांदेकर यांनी भारताच्या एकात्मता व अखंडतेसाठी आपल्याला आचरणात आणण्यास आवश्यक अशा समरसता स्वजागरण कुटुंबप्रबोधन नागरिक कर्तव्य पर्यावरण या पाच परिवर्तनांचे मार्गदर्शन केले. समापन कार्यक्रमात संमेलनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल परशुरामसंस्थान एस्.पी.एम्. विद्यालय यांचे आणि अर्थसाहाय्य करणाऱ्या प्रायोजकांचे देणगीदारांचे सहकार्य करणाऱ्या संस्कारभारती व विद्याभारती या संस्थांचे सुद्धा आभार मानण्यात आले. समापन कार्यक्रमासाठी परशुराम गावाच्या सरपंच मा. सौ. गायत्री जोगळे उपस्थित होत्या. समापन कार्यक्रमात श्री. टी. एन्. प्रभाकर यांनी कार्यकर्त्यांना सदैव कार्यरत राहण्याची प्रेरणा दिली.
या संमेलनाच्या आयोजनासाठी उत्तर रत्नागिरी जनपद अध्यक्षा डॉ. सौ. माधवी दिपक जोशी ( संस्कृतविभागप्रमुख डी. बी. जे. महाविद्यालय चिपळूण) आणि जनपद मंत्री श्री. मुकेश बामणे (संस्कृतशिक्षक जालगाव दापोली) यांच्या सह त्यांना सहकार्य करणारे मुंबई रत्नागिरी दापोली येथील अनेक कार्यकर्ते आणि चिपळूणातील स्थानिक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. कोंकण प्रांतात गोव्यापासून ते पालघर पर्यंत दूरवरून संमेलनासाठी परशुरामांच्या पुण्यक्षेत्राला चिपळूणला आलेले संस्कृतचे शिक्षक विद्यार्थी संस्कृतप्रेमी कार्यकर्ते या संमेलनातून संस्कृत प्रचारप्रसारासाठी अध्ययनअध्यापनासाठी प्रेरणा ऊर्जा एकीची शक्ती घेऊन पुन्हा जोमाने अधिक कार्यरत होण्यासाठी निघाले हे या संमेलनाचे यश आणि फलित होय.


डॉ. सौ. माधवी दिपक जोशी.
उत्तर रत्नागिरी जनपद अध्यक्षा
संस्कृतभारती.


  • Post By : Samskrita Barati Konkan
  • |
  • 14-01-2025
  • |